style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:Octomber 2017

 

पोलीस करतात तरी कायॽ

१२ तासांची ड्यूटी १६ तासांपर्यंत लांबते...म्हणजे उरलेल्या ८ तासांत काय ते ‘जगून घ्या’ आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या ड्युटीला हजर व्हा. दिवसभरात २०० ते ३५० माणसं तक्रारी घेऊन येणार, त्यांना शक्य तितक्या शांतपणे सामोरे जा. हवी तेव्हा, हवी तितकी रजा मिळेलच याचा भरोसा नाही. सणवार, ऊनपाऊस, आजारपणं सगळं बाजूला ठेवा आणि काम करत रहा. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या वगैरे लाड तर अजिबातच नाहीत. मनोरंजनॽ ते काय असतं बुवाॽ जेवण्या-खाण्याची उसंत नाही, तिथे fitness साठी वेळ कुठून आणणारॽ बरं, इतक्या धावपळीच्या कामात एखादी चूक, थोडी कुचराई चालेल म्हणावं तर तसंही नाही. सतत सावध रहा. तेही एक-दोन दिवस नाही, अगदी सतत.. आयुष्यभर.

फार कटकटीचं वाटतंय ना हे सगळंॽ का घ्यायचा इतका ताणॽ शांतपणे दुसरी कामं करावीत की! खरं आहे, पण असा विचार सगळ्यांना नाही करता येत. ही सगळी धावपळ, दगदग स्वतःहून स्वीकारणारी माणसंही असतात. आपण ज्यांना पोलीस म्हणतो तीच ही.. ‘वर्दीतली माणसं’.

अर्थात ही ‘वर्दी’ अंगावर चढवायला मिळणंही तितकं सोपं नाही. व ेगवेगळ्या पदांनुसार लेखी परीक्षा द्याव्या लागतात. त्यातून पार पडल्यावर प्रशिक्षण घ्यायचं. तेही अगदी सैन्यदलाच्या प्रशिक्षणाइतकंच खडतर असतं. हे सगळं झालं की मग त्यांना ती ‘वर्दी’ मिळते आणि ते पोलिसदलात दाखल होतात. संपूर्ण यंत्रणेत अनेक पदांची उतरंड असते. सुरुवात कुठल्या पदावरून केली त्यानुसार सर्वोच्च बढती कुठली मिळणार त्याचे निकष ठरतात. एकीकडे ही कार्यालयीन औपचारिकता असते आणि दुसरीकडे त्यांना आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये रोज मिसळायचं असतं. आपल्यातच राहून आपल्या संरक्षणाची जबाबदारी ते घेतात. साहजिकच त्यांना नागरिकांकडून येणारे अनुभवही अनेक प्रकारचे असतात.

अर्थात सामान्य नागरिक म्हणून आपलीसुद्धा काही जबाबदारी असतेच की. पोलिसांशी शांतपणे, अरेरावी न करता बोलावं, त्यांच्याशी सहकार्याने वागावं, काही नाही तर किमान वाहतुकीचे नियम पाळावेत, काही संशयास्पद आढळलं तर पोलिसांना खबर द्यावी, किरकोळ वादाच्या तक्रारी उगाच पोलिसांपर्यंत नेऊ नयेत इतकं तरी आपण निश्चितच करू शकतो.

पोलिसांची अपुरी संख्या आणि वाढते गुन्हे हा विषय तर अनेकांना माहीत असेल. त्याशिवायही, अशा अनेक अडचणी आहेत ज्यांतून मार्ग काढत त्यांना काम करावं लागतं; आणि त्यासाठी आपल्याकडून त्यांना कौतुकाची थाप वगैरे क्वचितच मिळते. तरीही त्यांची तक्रार नसते. जमेल तसं स्वतःला सांभाळत आपल्यासारख्या तमाम नागरिकांसाठी ही ‘वर्दीतली माणसं’ काम करत राहतात.

दुसरीकडे पोलिसांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या एकंदरीत यंत्रणेमध्ये चांगले बदल होत आहेत. त्यांची निवडप्रक्रिया बदलली आहे. किमान बारावी ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या उमेदवारांची भरती खात्यात होत आहे. नवनवे तंत्रज्ञान येत आहे, जे त्यांच्या तपासकार्यात उपयोगी ठरणार आहे. आणखीही अनेक बदल होताहेत जे पोलिसांसाठी आणि सामान्य जनतेसाठीही हिताचे ठरणार आहेत.

पोलिसांच्या जीवनाचे असे अंतरंग सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकरांनी खूप ओघवत्या भाषेत उलगडून दाखवले; आणि वेळ संपली तरी प्रश्न संपले नाहीत अशा वळणावर अवांतरमधल्या या सत्राचा समारोप झाला.

असेच वेगवेगळ्या विषयांचे अंतरंग पाहण्यासाठी आपण अवांतरच्या प्रत्येक सत्रात भेटणार आहोत. तर मग पुढच्या अवांतर मध्ये भेटूया नक्की!

नोव्हेंबर महिन्यातल्या अवांतरचा विषय आहे- नोटाबंदीचे परिणाम-एक तटस्थ विवेचन.

तर मग या आणखी एका वेगळ्या विषयासाठी १५ नोव्हेंबर,२०१७ चा दिवस आणि संध्याकाळी पाच वाजताची वेळ नक्की राखून ठेवा.

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts