style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | World Translation Day

जागतिक अनुवाद दिन


‘अनुवाद’ हा दोन भाषांना, दोन संस्कृतींना जोडणारा असतो.समृद्ध करणारा असतो. कारण ज्या भाषेतून तो येतो त्याची वैशिष्टये तो घेऊन येतो.म्हणजे जर इंग्रजीतून तो मराठीत केला तर तो इंग्रजीची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्टये घेऊन येतो. मराठीत त्याचा आस्वाद घेताना वाचकाला ती पार्श्वभूमी मराठीतून समजून घेता येते. एखादी गोष्ट इंग्रजीत जितकी उपयुक्त ठरते तितकीच ती अनुवादामुळे आणखी कितीतरी लोकांशी संवाद साधू शकते. त्यांना उपयुक्त ठरू शकते.आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात तर अनुवाद किंवा भाषांतर हे लोकांना, देशांना जोडणारे मह्त्त्वाचे साधन ठरत आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नुकतेच आम्ही इटलीमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो.तिथे आम्ही Service apartment घेतले होते. त्या मालकाला इटालियन भाषा येत होती. इंग्रजी येत नव्हती. पण असे एक app होते की त्यामुळे इंग्रजीचे इटालियन आणि इटालियनचे इंग्रजी भाषेत रुपांतर होऊन आमचे संभाषण कोणतीही अडचण न येता चालू राहात होते.


अनुवादाचे असंख्य प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार आपापल्या परीने महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ-ललित साहित्य.यामध्ये कथा,कादंबरी,चरित्र,नाटक आदींचा समावेश होतो. याचप्रमाणे गणित,विज्ञान या विषयांचा तांत्रिक मजकूरही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणता येतो. उद्योग,राजकारण यांसारख्या क्षेत्रांतही अनुवाद महत्त्वाची भूमिका बजावतो.


आतापर्यंत ‘अनुवादाचे सर्वसाधारण महत्त्व’ या विषयावर मला जे वाटले ते मी लिहिले आहे.आता मला अनुवाद करणाऱ्यांविषयी लिहायचे आहे. स्वतंत्र लिखाणात लेखकाला जे वाटेल ते त्याला मनमोकळेपणाने व्यक्त करता येते. पण अनुवाद करणाऱ्याचे तसे होत नाही. लेखकाने मांडलेला आशय योग्य पद्धतीने त्याच्या अर्थाला धक्का न लावता त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. ही जबाबदारी जास्त अवघड असते. स्वतंत्र लेखनात लेखकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या लिखाणातून व्यक्त होत असते. याउलट अनुवादकाचे कौशल्य हे की वाचकांना अनुवादक कोठेच स्वतः व्यक्त न होता वाचणाऱ्याला आपण मूळ लेखकाचेच लिखाण वाचत आहोत असे वाटू देणे,हे आहे.


दिवसेंदिवस अनुवादाचे महत्त्व वाढत चालले आहे. या क्षेत्रात विदुला टोकेकर मोठे काम करीत आहेत. नवनवीन उपक्रम राबवत आहेत. त्यांना आणि आपल्या सर्वांनाच जागतिक अनुवाद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा!लेखक – रोहिणी पेठे

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts