style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
‘ एका शब्दाची अंत्ययात्रा ’

मेला मेला ठार झाला. धुळ्यात तो संपला. जळगावात खपला. नाशकांत देवाघरी गेला. पुण्यात त्याचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. ( अय्या शब्दाचा प्राण... कित्ती रोमॅंटीक ! ) अमरावतीला तो कालवश झाला. अकोल्यात तो मृत्यू पावला. नागपूरात त्याची प्राणज्योत मालवली. वर्ध्यात वारला. नांदेडला निवर्तला. गोंदियात त्याचे निधन झाले. लातूरात तो आपल्याला सोडून गेला. नंदूरबारात तो मृत झाला. गडचिरोलीत गतःप्राण झाला. जालन्यात त्याचा जीव गेला. परभणीत त्याचा देहान्त झाला. यवतमाळमध्ये त्याचे देहावसान झाले. चंद्रपूरात तो मृत्यूमुखी पडला. साताऱ्यात तो दगावला. कोल्हापुरात त्यानं अखेरचा श्वास घेतला. कोकणात तो राम म्हणाला. औरंगाबादेत तो अल्लाला प्यारा झाला. ( धर्मांतर, सॉरी, विषयांतर होतंय का..... सगळीकडे सारखंच्चे राव....बायबलातही, प्रारंभी शब्द होता, असं आहेच की ! )

{ विद्येच्या माहेरघरात इतका शब्दच्छ्ल पुरे ! एक अगोचर पुणेकर : म्हणजे जिल्हे संपले की वाक्प्रचार ? हाहाहाहा ) }
घोळून घोळून सांगू नका हो, गेला तर गेला, सुटला, खलास झाला, पुढे काय, मुद्द्याचं बोला ना... (गॅस संपलाय, सिलेंडर आणायला जायचंय....)

मुद्दा म्हणजे हाच की, ज्यांनी ज्यांनी तो शब्द एकदा तरी वापरला त्यांनी त्यांनी या अंत्ययात्रेत सहभागी व्हा.

न वापरलेल्यांनी तर आधी धावत या... पाहा तरी... कोण होता, कसा होता, तोंडवळा कसा होतां... सकर्मक होता की अकर्मक ? त्याचे स्थळ दिवाणखाना होते की रस्त्यावरचा होता तो ? आज्ञार्थी होता की विध्यर्थी होता? सलानातेवाला होता की षष्ठीचा ?

‘तो’ आधी नियमितपणे वापरात होता. फक्त लिखाणापुरता नाही तर अगदी रोजच्या व्यवहारातही. पण नंतर कालबाह्य झाला. त्यामुळे लोकांनी नेमका कधी त्याचा वापर थांबवला त्यांनाही आता नीटसं आठवणार नाही. म्हणजे औटकी नाही का आऊटडेटेड झाली, तसंच हे ! अगदी अलिकडेच गेला तो ...... शेवटचे आचके देत गेला. ‘शब्द’ मेला. कुठला ? कुठला का असेना ! केवढे मेलेत आत्तापर्य़ंत, त्याला काही हिशोब नाही. (म्हणजे ? कुणी मांडला नाही अजून?) चांगला होता. पण गेला बिचारा.. धावत यायचा अडीअडचणीला. गेला. वापरला नाही. दुसरं काय होणार ? शेपटाचं काय झालं आपल्या ? गेली. आता शब्द गेला.

काना म्हणू नका, मात्रा म्हणू नका, उकार, आकार, रफार, अनुस्वार काssही म्हणू नका. (म्हणजे हे सगळं म्हणा..!) पुढे, मागे त्याला काहीही लावलं तरी किरकिर करायचा नाही. कंबरेवर, कंबरेखाली कुठेही काहीही लावा, अर्थ बदलून तात्काळ हजर ! त्याने वापरला तर रुबाबात पुल्लिंगी व्हायचा. ती वापरायची तेव्हा लाजत-काजत स्त्रीलिंगी व्हायचा. ‘ते’ नी वापरला तर... नपुसकलिंगी सुद्धा ! त्यासाठी वेगळा अर्ज भरा वगैरे असं काही नाही. शब्दाचा फायदा सर्वांना !

क्रियापदं वापरायचा. भाषा वाकवायचा. वाक्याचा कर्ताधर्ता कायम तोच असायचा. (डॅड, कर्ता म्हणजे noun की pronoun ? - कर्म माझं ! ) काहीही बोलाचाली झाली की हा पहिला पुढे. नऊ रस, सहा रिपु काहीही असो, याचं आपलं पडलं तरी नाक वर !

बायकांनी, पुरुषांनी, पोराटोरांनी, सख्या-सवंगड्यांनी, कवींनी, नाटककारांनी, साहित्यिकांनी, { ‘ नाटककार म्हणजे साहित्यिक नव्हेत ? ’ (मगाच्चाच तो अगोचर पुणेकर) } राजकारण्यांनी, गुंडांनी { ‘ च्यायला, हे दोन वेगवेगळे ? ’ ( हं, तोच तो. मगाच्चा... ) } बेवड्यांनी, ऐऱ्यागैऱ्यांनी, येऱ्यागबाळ्यांनी, हीन-दीन पीडितांनी, पंडीतांनी, विद्वानांनी, समाजवाद्यांनी, कम्युनिस्टांनी, भांडवलदारांनी, इकडच्यांनी-तिकडच्यांनी, यांनी-त्यांनी सगळ्यांनीच पूर्वी कधी ना कधी वापरलेला... ‘तो शब्द’ !!

हॉटेलात ( उपहारगृह.. तेच ते ), बागेत, घरात, दारात, मुतारीत, मसणात, शेतात, थेट्रात, शाळाकालेजात तर भरमसाट अगदी, हापिसात, इस्पितळात, अध्यात्मात (काय सांगता.. तिथेही ! ) कानाकोपऱ्यात, इकडे-तिकडे, कलियुगात जिकडं तिकडं याचीच चलती !

दहाव्याला नाही आलात तरी चालेल पण तिरडीला खांदा द्यायला जरुर या !

ज्यांनी ज्यांनी शब्द दिला, ज्यांनी ज्यांनी शब्द घेतला.. अगदी तळहातावर झेलला त्यांनी या हं ! बोलताना ज्यांनी मधूनच शब्द खाल्ला त्यांनीही या. शब्द चुकून तोंडातून निघून गेला, त्यांनीही या. कुणी कधी तीर्थरुपांच्या शब्दाला शब्द दिला असेल, कुणी सख्ख्या मित्राला शब्दात पकडलं असेल, कुणी एखाद्या कातरवेळी शब्द जरा जपूनच वापरले असतील, बोलताना शब्दमर्यादा पाळणारे, ओलांडणारे वक्ते असतील, शब्दातीत वर्णनं करणारे साहित्यिक असतील, शब्दबंबाळ नाटकं लिहिणारे नाटककार असतील, श्लेषाच्या (शेषाच्या नव्हे ! ) डोक्यावर बसून शाब्दिक कोट्या करणाऱ्यांना तर या अंत्ययात्रेचे आग्रहाचे आमंत्रण !

मौन सोडून या. भरपूर बोलायला या. बक्कळ शब्द घेऊनच या बरोबर.. वापरायला.. नाहीतर तेही मरुन जातील ! (भ्रमणध्वनी वगैरे सुद्धा चालतील)

शब्दाशब्दाला शिव्या घालणाऱ्यांनी, रुसून फुगून, एकमेकांशी चकार शब्द न बोलणाऱ्या प्रियकर-प्रेयसींनी, शब्द पाळणाऱ्या, शब्दाला जागणाऱ्या बाजीप्रभूंनी आणि त्यांच्यावर पोवाडे रचणाऱ्या शब्दप्रभूंनी, शब्द मोडणाऱ्या नेत्यांनी, एक शब्द बोलू नकोस असे खडसावणाऱ्या जुन्या शाळातल्या गुरुजींनी, शब्दप्रधान गायकी गाणाऱ्यांनी, ज्यांचा शब्दन् शब्द खरा ठरतो अशा भविष्यवेत्त्यांनी…. अजिबात चुकवू नका ही शब्दाची अंत्ययात्रा ! शब्दार्थासाठी आसुसलेल्या सामान्य माणसांनी, शब्दकोडे सोडवणाऱ्या छांदिष्ट्यांनी, शब्दालाच प्रमाण मानणाऱ्या प्रामाणिकांनी आणि अगदी जीभेवर आहे रे.. म्हणून हळहळणाऱ्यांनी तर नक्कीच या !!

त्या शब्दाला श्रद्धांजली वाहायला झाडून सगळ्यांनीच या !

‘ शब्दाचं ’ शेवटचं दर्शन ! वाडवडलांनीनात्यागोत्यातल्यांनीसंमेलनवाल्यांनीबिनसंमेलनवाल्यांनीसुतारांनीचांभारांनी संगीतकारांनीशास्त्रज्ञांनीरांडांनीराजकारण्यांनीशेतकऱ्यांनीशिक्षकांनीविद्यार्थ्यांनीजुगाऱ्यांनीआस्तिकांनीनास्तिकांनी सगळ्यांनीच या भव्य अंत्ययात्रेत सहभागी होऊयात ! पादत्राणं काढून, एक मिनीट मौन पाळूयात. ठराव पास करुयात. त्या शब्दाचा एखादा पुतळा उभा करुयात !!


संदेश कुलकर्णी
© 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts