style2
+91 02-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | भाषांतर ते अनुवाद

‘‘भाषांतराला पर्याय नाही!’’, पत्रकारिता शिक्षणाच्या सुरुवातीलाच एडिटिंगच्या प्राध्यापकांनी ऐकवलेले हे वाक्य. त्यापूर्वीही, मराठी माध्यमात शिकल्याने इतर भाषांमधील लेखन समजून घेण्यासाठी मनातल्या मनात भाषांतराची प्रक्रिया होतच असावी. इंग्रजी बोलायची वेळ आलीच तर मुळात मातृभाषेत सुचलेले विचार मेंदूत ट्रान्सलेट करून पर्यायी इंग्रजी शब्द शोधून (न सापडलेले गाळून) मग अडखळत अडखळत मांडले जायचे...


पण, वृत्तपत्र माध्यमात तुम्हाला वृत्तसंस्थांच्या बातम्या मराठीत लिहाव्या लागणार आणि त्यासाठी भाषांतराचे कौशल्य आवश्यक नव्हे, तर अनिवार्य आहे, इतका निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर मग याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात झाली. हळूहळू ते जमूही लागले आणि पुढे या क्षेत्रात आल्यानंतर तर सवयीचेच झाले. पण, बातम्या कुणी वाक्यरचनेसाठी, संबंधित घटना जगण्यासाठी/अनु‍भवण्यासाठी वाचत नाही. (Hopefully...) बातम्या वाचल्या जातात, त्यातले माहिती/तपशील समजून घेण्यासाठी. सहाजिकच त्या लिहिण्याची विशिष्ठ पद्धत ठरलेली असते आणि भाषांतरही त्या पद्धतीनेच केले जाते. त्यामुळे अपवाद वगळता त्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा (सर्जनशीलता) भाग कमी असतो. कदाचित म्हणूनच त्याला भाषांतर म्हणतात, अनुवाद नाही.


या भाषांतर नसलेल्या अनुवादाशी माझी ओळख निःसंशय ट्रान्सलेशन पॅनाशिया आणि विदुला टोकेकर यांच्यामुळे झाली. अंगवळणी पडलेल्या भाषांतरापेक्षा हा अनुभव खूपच वेगळा होता. त्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळे शब्दकोष धुंडाळावे लागले. एका इंग्रजी शब्दाला तीन-चार किंवा त्याहूनही जास्त पर्यायी शब्द असू शकतात, त्यातील मूळ आशयाला अधिकाधिक समर्पक कोणता, याची निवड करावी लागते. कधीकधी तर पर्यायी शब्दांची चौकट धुडकावून थेट आपल्याला समजलेला अर्थ मांडावा लागतो, एवढे करूनही संपूर्ण प्रकरण वाचताना एकसंधता येईलच, याची शाश्वती नसते. अशावेळी काही भाग पुन्हा लिहावा लागू शकतो, यांसारख्या अनेक गोष्टी शिकता आल्या आणि अद्यापही बऱ्याच शिकण्यासारख्या आहेत. अनुवाद हा कोणत्याही एका हुकमी तंत्रात बसवता येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी ‘ट्रायल-एरर’ पद्धत वापरणेच योग्य आहे एवढे मात्र आता लख्ख समजले आहे.


योगायोगाने मला आतापर्यंत मिळालेली पाचही पुस्तके वेगळ्या धाटणीची (genre) होतीच, त्याचबरोबर माझ्या वैयक्तिक वाचनआवडींच्या कक्षेबाहेरचीही होती. त्यामुळे बातम्यांचे भाषांतर करताना जाणवतो, तसा आत्मविश्वास (फाजीलही असेल कदाचित...) मला अद्याप अनुवादाबाबत जाणवलेला नाही, आणि एकाअर्थी सर्जनशीलता जिवंत ठेवण्यासाठी तो न जाणवणेच उपकारक आहे! कारण, धडपडत, प्रयोग करत, जमत नसल्याने त्रस्त होऊन, प्रसंगी डेडलाइन चुकवून, अखेर अचूक साधल्याचा आनंद हा त्या आत्मविश्वासापेक्षा अधिक समाधानकारक आहे, इतके मी आता एकाचवेळी भाषांतर आणि अनुवाद दोन्ही क्षेत्रात कार्यरत असल्याने सांगू शकतो.


Author- Sanket D. Lad

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts