style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | अनुवादाच्या दिमतीला

अनुवाद या साहित्यप्रकाराकडे वळावं असं अधिकाधिक लोकांना वाटत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. दोन भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या आणि अनुवादाची कला आत्मसात केलेल्या चांगल्या अनुवादकांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यकृतीं भिन्नभाषिक वाचकांपर्यंत पोचतात. तांत्रिक अनुवाद करणारे अनुवादक तांत्रिक आशय वापरकर्त्यांपर्यंत व उपभोक्त्यांपर्यंत पोचवतात, एक प्रकारे भाषा समृद्धही करत असतात.हौस म्हणून अनुवाद करणे या पायरीपासून जेव्हा व्यावसायिक वृत्तीने अनुवाद करण्यापर्यंत अनुवादक पोचत असतो, तेव्हा आणखी काही बाबींचं भान येत जातं. माझा अनुभव असा आहे, की भाषेवर प्रभुत्व आहे, म्हणून अनुवादाला सुरुवात केलेली मंडळी ‘अधिक जलद, अधिक दर्जेदार, अधिक व्हॉल्यूम’ या तत्त्वावर काम करताना जर्राशी अडखळतात. काही त्यातली मेख समजून पुढे जातात, तर काहींचा उत्साह मात्र ‘अरे बापरे, आता हे काय नवीन शिकायचं’ या कल्पनेने बारगळतो. काहींचा बाणा असतो, की ‘मला अनुवाद करता येतोय ना, मग काँप्यूटर वगैरे तुम्ही बघा. ’ हा बाणा काही मर्यादेपर्यंत चालून जातो, पण जेव्हा तशाच गुणवत्तेचं काम ग्राहकाला हव्या तशा सॉफ्ट कॉपीत मिळत असेल, तर आपलं काम कमी होऊ शकतंच आणि हे टाळता येऊ शकतं.


अनुवाद करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढतोच आहे, आणि तो वाढतच जाणार आहे. व्यावसायिक काम करताना वापरायचं तंत्रज्ञान हे एक साधन आहे, आणि त्याचा उपयोग करून आपली कार्यक्षमता, गुणवत्ता आणि व्यवसायवृद्धी राखता येते.


अनुवादातलं तंत्रज्ञान म्हटलं, की पहिला शब्द मनात येतो तो म्हणजे इंटरनेटवरून केलेलं भाषांतर. म्हणजे एका रकान्यात आपण इंग्रजी वाक्य टाईप केलं, की दुसऱ्या रकान्यात मराठी वाक्य अवतरतं. पण आपण त्याबद्दल विचार करणार नाही, कारण ते माणसांनी केलेलं भाषांतर नाही.


आपण आत्ता केवळ लिखित अनुवादाचा विचार करू. यात पुस्तकांचा अनुवाद तसंच तांत्रिक किंवा व्यावसायिक कागदपत्रांचा अनुवाद येतो. अनुवादात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पाच पायऱ्यांवर करता येतो. 1) आकलन, 2) प्रत्यक्ष प्रक्रिया, 3) व्यक्त करणे, 4) कामाची डिलिव्हरी आणि 5) पैशाचे हस्तांतरण.


आकलन

मूळ आशय नेहमीच साधासोपा असतो असं नाही. पुस्तकांमध्ये अनेकदा मूळ भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमधली वाक्यं, म्हणी असू शकतात. म्हणजे इंग्रजी कादंबरीतलं एखादं पात्र स्पॅनिश असेल, किंवा स्पॅनिश वळणाचं इंग्रजी बोलत असेल, तर कादंबरीत पुष्कळदा त्या भाषांमधले शब्द येतात. अनेकदा सांस्कृतिक संदर्भ असलेला शब्द असतो. पिठलंभात या शब्दाचं दुसऱ्या भाषेत भाषांतर होऊ शकेल, पण तो ‘कमी श्रमांत झटपट होणारा व त्यामुळे सहसा प्रवासाहून आल्यावर करावयाचा’ पदार्थ आहे हा सांस्कृतिक संदर्भ नसेल, तर अनुवादातली मजा जाते. स्लँग वापरलेली असते, ती कळावी लागते. कधीकधी विशिष्ट नावांचे उच्चार त्या त्या भाषेनुसार अचूक द्यायचे असतात. कधीकधी त्या त्या भाषेच्या, देशाच्या, तात्कालिक संदर्भानुसार नुसतीच एखादी टिप्पणी केलेली असते किंवा विशेषण लावलेलं असतं. ते शोधून काढावं लागतं. या सगळ्यासाठी इंटरनेट फारच कामास येतं. शब्दार्थ, उच्चार, नकाशे, छायाचित्रं, जनसामान्यांसाठी किचकट तांत्रिक माहिती असं सगळं उपलब्ध असतं. त्यामुळे आपल्या संपर्कातल्या तज्ज्ञतेवर अवलंबून राहाण्याचं काही कारण नसतं, किंवा त्यासाठी प्रचंड दगदग, हेलपाटे, वेळा जुळणे या कशाचीच गरज नसते. ते नकाशे, आकृत्या बघणं, समजून घेणं ही मेहनत करावी लागते, पण त्यात मजा येते, अनुवादक समृद्ध होतो. अनुदाद सरस होतो. आमच्या टीममधला एक अनुवादक नवीन लेखकाचं पुस्तक अनुवादासाठी हातात आलं, की आधी त्या लेखकाचा इत्थंभूत परिचय, त्याच्याबद्दलची अवांतर माहिती, फोटो, तो कसा जगला वगैरे सगळं वाचून काढतो. परकायाप्रवेशासाठी ही त्याची ‘तांत्रिक’ तयारी ! पण खरोखरच मूळ पुस्तक कधी, कुठे लिहिलं, त्या भाषेतल्या आणि काळातल्या वाचकांचं त्याबद्दल काय मत होतं, हे जाणून घेतल्याने अनुवाद करताना निश्चितच एक जागरूकता येते.


प्रत्यक्ष अनुवाद प्रक्रिया –

संगणकाच्या मदतीने भाषांतर करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. जरी प्रत्यक्ष काम अनुवादक करत असला, तरी पुन्हापुन्हा येणारे शब्द, वाक्यांश, संज्ञा, विशेषनामे हे पुन्हापुन्हा करण्याचा वेळ वाचतो. अर्थात याचा उपयोग करताना डोळे उघडे ठेवावे लागतातच. त्याशिवाय जर पुनरुक्त शब्दसंख्येचा दरात काही फरक पडणार असेल, तरी या सॉफ्टवेअरमधून आपल्याला तीही माहिती कळते. तांत्रिक किंवा व्यावसायिक कागदपत्रांच्या भाषांतरासाठी याचा पुष्कळ उपयोग होतो. वेग वाढतो, उत्पादकता वाढते.


व्यक्त करणे

अर्थात लिहून काढणे. हाताने लिहिण्यात चुकीचं निश्चितच काही नाही. पण संगणकावर टायपिंग करणं ही इतकी मामुली गोष्ट आहे, की तिचा बाऊ मनात ठेवून हातानेच लिहिण्याचा आग्रहही धरू नये. साधं वर्ड फाइलमध्ये लिहीत असाल, तरी त्याची विविध साधने वापरून टायपिंग अधिक वेगाने करता येतं. हाताने लिहिण्याची सवय असलेल्यांना, केवळ सवयीचा भाग म्हणून ते सोयीचं वाटतं. नेटाने जरा टाइपच करायचं ठरवलं, की त्याचीही सवय होते आणि हात भराभर चालू लागतो. ‘..पण मला हेच सोयीचं वाटतं..’ या वाक्यात गडबड एवढीच होऊ शकते, की तुमच्या प्रकाशकाला, एजन्सीला किंवा कंपनीला ते गैरसोयीचं वाटू शकतं. कुठल्या फॉर्मॅटमध्ये ग्राहकाला डिलिव्हरी हवी आहे, हे ते सांगतात – वर्डमध्ये, स्प्रेडशीटमध्ये, पॉवरपॉईंटमध्ये – त्याप्रमाणे ती देण्याने ग्राहक निश्चिंत होतो आणि पुन्हा आपल्याकडे येतो. भारतीय भाषांमध्ये फाँट हा एक छळवादी प्रकार -- होता. आपण जो फाँट वापरू तो ग्राहकाकडे, त्याच्या प्रिंटरकडे, डिझाइनरकडे नसतो च. मग तो पाठवा, मग ‘फाँट फिरणे’ असा एक भीषण प्रकार. अत्यंत अनुत्पादक वेळ. आता सुंदर युनिकोड फाँट उपलब्ध आहेत. इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरून युनिकोडमध्ये टायपिंग करणे ही सर्वात निर्धोक पद्धत आहे. हा कीबोर्ड इंडियन स्टँडर्डप्रमाणे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व भारतीय भाषांसाठी तो समान आहे. म्हणजे ज्या कळीने मराठी क अक्षर उमटते, तिनेच गुजराथी, तमिळ, मणिपुरी, उडिया लिपींमधलं क अक्षर उमटतं. आहे की नाही जादू? जोडाक्षरं बरोबर दिसतात.


कामाची डिलिव्हरी –

अर्थात आपण केलेलं काम ग्राहकापर्यंत पोचवणं. ग्राहक आणि अनुवादक दोन भिन्न ठिकाणी असणं, वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये असणं हे सर्वसामान्य आहे. तसंच कित्येक दिवस एकत्र काम करणाऱ्या लोकांनी एकमेकांचं तोंडही पाहिलेलं नसणं हेही सर्वसामान्य आहे. केलेलं काम तातडीने हवं असणं हा तर नियमच आहे. सहसा आलेलं काम गोपनीय ठेवायचं असतं. त्यामुळे हे काम ग्राहकापर्यंत कसं पोचवायचं, याची ग्राहकाने काही विशिष्ट पद्धत सांगितली असेल, तर त्याच पद्धतीने ते द्यावं लागत. फाईल शेअर करा, की ड्रॉपबॉक्समध्ये अपलोड करा, की सर्व्हरवर टाका, की मेलवर पाठवा, की आणखी काही करा – सांगितल्याप्रमाणे करणे. ते साधन आपण यापूर्वी कधी वापरलं नसेल, तरी त्यातलं काहीच अवघड नसतं. करून पाहिलं, की जमतंच. कधी एक मोठं काम अनेक जणांना वाटून दिलं असलं, आणि ग्राहकाला इंटरनेटवरच्या अनेकविध साधनांपैकी काहीतरी वापरून मीटिंग करायची असते. तर त्यात उत्साहाने सहभागी व्हयचं.


पैशांचे हस्तांतरण –

मी म्हटलं तसं, परस्परांचं तोंडही न पाहिलेल्या व्यक्ती या सायबर युगात यशस्वीपणे दीर्घकाळ व्यवहार करत असतात. पैसे परस्पर बँकेत जमा होणं ही किती आनंदाची घटना असते हे काही मी सांगायला नकोय. आपला पॅन, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, स्विफ्ट कोड देता यायला हवे. आपल्या कामाचं बिल सुद्धा बनवायला भाषांतराला मदत करणारी सॉफ्टवेअर्स मदत करू शकतात.


शेवटी तंत्रज्ञान हे एक साधन आहे. आपल्या कौशल्याला मदत करणारं. केवळ ‘कालपर्यंत केलं नाही म्हणून’ उगाच बिचकत न बसता किंवा कंटाळा न करता या सोप्या सोप्या गोष्टी आत्मसात केल्या की खरंतर अनेक कंटाळवाण्या गोष्टींमधून सुटका होते आणि आपल्या आवडीचं काम – लेखन, अनुवाद करायला आपल्याकडे वेळ आणि उत्साह राहातो.


लेखक – विदुला टोकेकर,
ट्रान्सलेशनपॅनाशिया.
www.translationpanacea.in


Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts