style2
+91 02-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | कवितांचा अनुवाद

कवितांचा अनुवाद

 

भाषांतराच्या जगात अनेक वर्षे काम करत असले तरी बहुतेक सगळं काम गद्य विषयांत केलेलं होतं. पद्यलेखनाचा किंवा कवितांचा अनुवाद करण्याचा अनुभव तसा फारसा नव्हता गाठीशी. पण मग कामानिमित्त कधीतरी तेही करायला मिळालं आणि जाणवलं की बरं जमतंय हेसुद्धा.

 

अचानकच समोर आलेल्या या अनुवादप्रकाराच्या बाबतीत मी  कसा विचार करते तेवढंच सांगण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे.  गद्य आणि पद्य हे दोन्ही लेखनप्रकार अगदीच भिन्न आहेत हे वेगळं सांगायला नकोच.  गद्यामध्ये एखाद्या शब्दासाठी नेमका शब्द नाही मिळाला तर थोडे जास्त शब्द वापरून अर्थ मांडण्याची मुभा असते.  पद्याच्या बाबतीत ते होत नाही.  तिथे मोजक्या शब्दांत अर्थ मांडावा लागतो.

 

मुक्तछंदाच्या कवितांमध्ये अनेकदा यमक हा प्रकार नसतो.  तसं असेल तर अनुवाद करतानाही यमक जुळवण्याचं बंधन राहत नाही. जुळवता आलं तर ठीकच आहे पण नसलं तरी चालू शकतं.  हो पण जिथे यमक जुळवणं आवश्यकच असतं तिथे मात्र बऱ्यापैकी कसरत करावी लागते.  

इथे काही उदाहरणं पाहता येतील:-

 

No matter how rich you are
there will be no meaning of contract and obligation
once you are in love
you just want to love the person you love
and you will learn to find how graceful loving a person can be for this moment
present will never be back but 
this is eternal 


अमाप असतील तुझ्या धनराशी

पण  नुरेल अर्थ सौद्यांना आणि बंधनांनाही

जेव्हा तुला चाहूल लागेल प्रेमाची

तेव्हा फक्त प्रेम द्यावंसं वाटेल त्या जिवलगाला

अन् मग कळेल तुला

किती सुंदर असतं कोणावर तरी प्रेम करणं

हा क्षण परत नाही येणार कधी

तरी अनंतकाळ राहिल तुझ्या आयुष्यात

 

ही मुक्तछंदातली कविता आहे. त्यामुळे त्यात कुठेही यमक जुळवलेले नाही.  साहजिकच अनुवाद करताना ती मुभा घेणं शक्य होतं.  तरीही मूळ कवितेत ओळींची लांबी किती कमीजास्त आहे ती लक्षात घेतली.  मूळ अर्थाला धक्का न लावता शब्दयोजना केली.  उदाहरणार्थ धनराशी, प्रेमाची चाहूल, जिवलग वगैरे.  

अशाच एका वेगळ्या कवितेच्या आणखी काही काव्यपंक्ती  अशा आहेत-

 

Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I-
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

 

आजपासून अनेकानेक वर्षांपूर्वी कधीतरी

जंगलात दोन दिशांना धावल्या दोन वाटा, आणि मी-

मी निवडली त्यातली कमी मळलेली पायवाट

आणि तिथूनच झाली नव्या बदलांची सुरुवात

 

इथेही यमक जुळवलेलं नव्हतंच.  पण ages या शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे. अनुवाद करताना मी वर्षे या शब्दाऐवजी अनेक या शब्दाची द्विरुक्ती केली आणि मूळ लेखनाशी साम्य साधण्याचा प्रयत्न केला.  त्या ओळीची लांबीदेखील त्यामुळे वाढवता आली.  मूळ कवितेत दिशा या अर्थाचा शब्द नाही. पण पुन्हा एकदा मूळ अर्थाशी प्रामाणिक राहत तो शब्द मी वापरलेला आहे.  मळलेली पायवाट हा शब्दप्रयोगदेखील असाच चपखल बसून गेला.

 

आँखों को वीसा नहीं लगता,
सपनो की सरहद नहीं होती 
बंद आँखों से रोज़ मैं
सरहद पार चला जाता हूँ

 

दूरवर जाते नजर, व्हिजाची काय तमा

स्वप्नांच्या भरारीला नाही कुठली सीमा

मिटल्या पापण्यांमध्ये जागवत आठवणी

सीमेपलीकडच्या आकाशाला मी रोज घालतो गवसणी.

 

इथे मूळ कविता हिंदीत आहे आणि तिचा मराठीत अनुवाद केलेला आहे.   इथेही मुक्तछंदच आहे. तरीही अनुवाद करताना नेमके शब्द मिळाले म्हणून यमक जुळवलेलं आहे.  मुक्तछंदामुळेच थोडी मुभा घेऊन ओळींची लांबीही वाढवलेली आहे.  आठवणींचा उल्लेख मूळ काव्यात नाही. पण एकंदरीत विषय पाहता तो  अध्याहृत आहे असं गृहीत धरून त्यानुसार शब्दयोजना केली आहे.

 

एकंदरीतच, पद्यरचनेचा अनुवाद करताना मूळ अर्थाशी इमान राखत जास्तीचे किंवा वेगळे शब्द वापरण्याचं स्वातंत्र्य घेता येतं.  ओळीची लांबी किंचित कमीजास्त होऊ शकते.  पण ओळींची संख्या मात्र बदलता येत नाही. गेयता हा कवितेचा गाभा आहे. त्यामुळे ती  गेयता हरवणार नाही याकडेही लक्ष द्यावं लागतं.  शब्दांची निवड करतानादेखील शब्द खूप क्लिष्ट नसतील हे पहावं लागतं. 

 

थोडक्यात सांगायचं तर सहजसोपे, चपखल बसणारे, गेयता असलेले, लयबद्ध आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मूळ अर्थाशी इमान राखतील असे शब्द वापरत कवितांचा अनुवाद करणं हे कसोटीचं काम आहे.  दमछाक होते असा अनुवाद करताना पण तितकाच आनंदही मिळतो हे नक्की.

- Aarti Deshpande


Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts