style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar: May 2018

 

Transactional Analysis

दोन मैत्रिणींनी भेटायचं ठरवलं. काही कारणाने त्यातली एकजण वेळेवर पोहोचू शकली नाही. पण दुसऱ्या मैत्रिणीने चिडचिड करण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेतली. वयानुसार येणाऱ्या आजारांनी ग्रासलेले वडील औषधं वेळच्या वेळी घेत नाहीत, पथ्यं पाळत नाहीत म्हणून मुलगा त्यांना रागावला. पण त्यांनी मात्र आपली काहीच चूक नसल्याचा कांगावा केला. रोजच्या आयुष्यात घडणारे, म्हटलं तर साधे वाटणारे प्रसंग. पण त्या प्रसंगांना एखादी व्यक्ती कशी सामोरी जाते त्यावर बरंच काही अवलंबून असतं.

एखादी व्यक्ती इतरांशी कसं वागते, कसा संवाद साधते त्याचं विश्लेषण करणाऱ्या शास्त्रालाच Transactional Analysis असं म्हणतात. Transactional Analysis असं सांगतं की इतरांशी वागता-बोलताना व्यक्तीची एक भूमिका असते. पालक, लहान मूल आणि प्रौढ अशा त्या तीन भूमिका असतात. मात्र त्या भूमिकांचा वयाशी संबंध नसतो. म्हणजे एखादी लहान मुलगीसुद्धा प्रौढ भूमिका स्वीकारुन काहीतरी समजूतदारपणे बोलताना दिसते आणि त्याउलट एखादे आजोबा लहान मुलाच्या भूमिकेतून लहानसहान तक्रारी करताना दिसतात. समोरची व्यक्ती आणि प्रसंगांनुसार आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद बदलू शकतात. इतरांविषयीची आणि स्वतःविषयीची मतंदेखील या संवादावर परिणाम करतात. मात्र या सगळ्याचं मूळ आपल्या व्यक्तिमत्त्वात असतं. आणि व्यक्तिपरत्वे बदलणारं हे व्यक्तिमत्त्व जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांतच तयार झालेलं असतं. अन् मग वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांतून हे व्यक्तिमत्त्व पक्कं होतं. मग पुढे आयुष्यभर सभोवतालच्या घटनांना, माणसांना आपण कसं सामोरं जातो ते त्या लहान वयातल्या अनुभवांवर अवलंबून असतं. आणि या सगळ्याचाच अभ्यास Transactional Analysis मध्ये केला जातो. थोडक्यात सांगायचं तर एखादी व्यक्ती इतरांशी जे वागते त्यामागची कारणं Transactional Analysis मुळे समजतात; आणि त्यानुसार व्यक्तिमत्त्वाला वळण देऊन व्यक्तीचं वर्तन सकारात्मक करता येऊ शकतं.

एकंदरीतच माणूस जे वागतो त्यामागची कारणं जाणून त्यावर उपाय सुचविणारा Transactional Analysis हा विषय एरिक बर्न यांनी सर्वप्रथम 1958 मध्ये सर्वांसमोर मांडला. व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व यांवर आधारित असलेला हा विषय आपल्याला अधिक चांगलं जगायला शिकवतो. या विषयाचा अभ्यास करताना तीन गोष्टी गृहित धरलेल्या असतात, एक म्हणजे लोकांमध्ये विचार करण्याची क्षमता असते, दुसरं, तुमचं नशीब तुम्ही स्वत: घडवू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकदा घेतलेले निर्णय बदलता येतात.

हे झालं या विषयाबद्दल; आणि माणसांबद्दल म्हणायचं तर कोणतीही परिस्थिती हाताळताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर जगणं-वागणं सोपं होऊ शकतं. स्वतःला हाताळणं, समोरच्याला हाताळणं आणि एकंदर परिस्थिती हाताळणं.

सैद्धांतिक विषय असल्यामुळे त्यात अभ्यासण्यासारखे अनेक मुद्दे आणि उपमुद्दे आहेत. केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल करण्यासाठीच नाही तर इतरांना समजून घेण्यासाठी सुद्धा हा विषय खूप उपयोगी ठरतो. अधिक सखोल अभ्यास केला तर अनेक क्षेत्रांतील करीअरची संधीदेखील या विषयामुळे मिळू शकते.

नेमक्या शब्दांत सांगायचं तर ज्यांना माणसं समजून घ्यावीशी वाटतात त्यांनी Transactional Analysis चा अभ्यास जरूर करावा. एकदा माणसं समजू लागली की मग, “माणसं अशी का वागतातॽ” या प्रश्नाचं उत्तरही ओघानेच मिळू लागेल.

Transactional Analysis विषयी अशी बरीच माहिती श्री.आनंद फाटक यांनी अतिशय ओघवत्या भाषेत आणि मुद्देसूदपणे सर्वांसमोर मांडली आणि अवांतरचं हे आणखी एक सत्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं.

आता प्रश्नांचा उल्लेख झालाच आहे तर अवांतरच्या पुढच्या सत्राबद्दलही बोलूया. पुढच्या सत्राचा विषय आहे ‘प्रश्नाख्यान’. आता हे प्रश्नाख्यान म्हणजे काय बुवाॽ पडला ना प्रश्नॽ असे हे प्रश्न पडण्याची सुरुवात जिथून होते त्याबद्दलच बोलणार आहोत आपण. कुठल्याही गोष्टीबद्दल कुतूहल असेल तर आपोआपच अनेक प्रश्न पडतात आपल्याला. अन् त्या प्रश्नांच्या उत्तरांमधून सुरू होतो एक संवाद. आपल्या सभोवतालच्या जगाशी. तर असं हे कुतूहल आणि त्यातून तयार होणाऱ्या प्रश्नांबद्दल आपल्याशी बोलणार आहेत, विदुला टोकेकर. चुकवूच नये असं हे अवांतरचं पुढचं सत्र होणार आहे, २० जून २०१८ रोजी. ..अर्थातच ट्रान्सलेशन पॅनाशियाच्या कार्यालयात.


English Summary

Transactional Analysis

Two girls, who are also best friends, decided to meet at some place. For some reason one friend could not reach on time. But the other understood the situation rather calmly. In another instance, an old man with health problems refuses to take medication and care. This angers his son. However, the father thinks he has done a nothing wrong. These are examples of day-to-day situations that everyone faces. What differs is how we react to them.

Transactional Analysis (TA) is the term used to describe how a person interacts with others. According to TA, a person can play three distinct roles while reacting to a situation: child, parent or adult. These roles have nothing to do with the age of the person. It explains why sometimes a little girl can give an adult-like reply to a question, whereas an old man can behave like a child and throw tantrums.

Reactions and responses are guided by various factors like the context of communication, opinion about self, and other people's reaction. Responses and reactions originate from one's personality. Personality varies with each individual, and starts developing from the age of six months. By the age of five years, the personality is imprinted within the individual based on experiences till this age. TA is a subject that studies all these aspects.

TA was first introduced by Dr. Eric Burn in 1958. It's theory is based on ‘Person and Personality’. TA assumes the three following factors:

1. People have the ability to think
2. One can create one's own destiny
3. Decisions once made can be changed

Those interested in understanding behaviour of oneself and others should study TA. It helps to bring about a positive change in how one tackles situations, conflicts and people. TA expert, Shri Anand Phatak explained all these details about Transactional Analysis in an interactive session of Avantar.

The next session of Avantar brings to you yet another interesting topic called “Asking Questions”. Curiosity is important to our existence as it defines how we understand the world around us. Asking the right questions can lead to getting answers to our issues. Vidula Tokekar will explain this in more detail at our next Avantar session.

So remember to block the date and attend the next Avantar session on 20th June, 2018.Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts